पुणे – राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत प्रथमच एकूण १० हजार ९४९ पदांसाठी प्रक्रिया राबवून इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेगा भरतीनंतर मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे, तसेच राज्यातील नागरिकांना विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे.
भरती प्रक्रियेअंतर्गत १० संवर्गातील पदांसाठी अंतरिम निवड व प्रतीक्षा याद्या आणि गुणवत्ता यादी नुकतीच आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतील आहारतज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहायक, दंत आरोग्यक, कनिष्ठ तांत्रिक सहायक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, ग्रंथपाल आदी पदांची अंतरिम निवड व प्रतीक्षा याद्या व गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या १० संवर्गातील नियुक्ती ८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार असून. उर्वरित संवर्गातील अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी ८ दिवसांत लावण्यात येणार आहे. नियुक्त्यादेखील लवकरच करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.