वॉशिंग्टन – चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतच करोना विषाणूची निर्मिती झाली असून याचा मला आता ठाम विश्वास असल्याचे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
एका मुलाखतीत ते म्हणाले की, अमेरिकेच्या गोपनीय दस्तावेजातही ही शंका खोडून काढण्यात आली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की या विषाणूची उत्पत्ती प्रयोगशाळेतच झाली असल्याच्या शक्यतेबाबत आता मुळीच संशय किंवा शंका राहिलेली नाही.
जगात जेव्हापासून करोनाचा धुमाकुळ सुरू झाला आहे, तेव्हापासून ट्रम्प सातत्याने चीनकडेच बोट दाखवत आहेत. ते अमेरिकेचे अध्यक्ष असताना तर करोना विषाणूचा उल्लेखही ते चिनी व्हायरस असाच करत होते.
करोनाचा प्रसार झाल्यावरही चीनने या विषाणूबाबतची माहिती जगापासून लपवून ठेवली होती. हा आजार संसर्गाने पसरतो याची त्यांना कल्पना होती. मात्र त्यांनी इतर देशांना सावध केले नाही किंवा त्या देशांमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवाही थांबवल्या नाहीत. तसेच चीनने करोनाची कबुली देण्याच्या अगोदर नोव्हेंबर 2019 मध्ये घडलेल्या एका घटनेकडेही ट्रम्प यांनी लक्ष वेधले.
ते म्हणाले की, संबंधित प्रयोगशाळेत काम करणाऱ्या तीन संशोधकांनी त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले जावे असे सांगितले होते. याचाही उल्लेख गोपनीय अहवालात होता असे ते म्हणाले. त्यामुळे तुम्ही वुहानच्या प्रयोगशाळेत या विषाणूची निर्मिती झाली असल्याची शक्यता आहे असे म्हणू शकतात व आपला तर तसा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.