नवी दिल्ली – गेल्या सव्वा वर्षापासून जगात करोनाचा कहर सुरू आहे. संचारबंदी, सोशल डिस्टन्स, लॉकडाऊन, बेड, रूग्णालये आणि आक्सिजन व व्हेंटिलेटर हेच शब्द कानावर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यातल्या त्यात एक आणखी खळबळजनक बातमी समोर आली होती. त्यानुसार 2015 मध्येच चीनमध्ये करोनाबाबत अर्थात या जैविक शस्त्राबाबत चर्चा झाली होती असे समोर आले.
थोडक्यात करोना मानवनिर्मित विषाणू आहे का, या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. आता याच दाव्याला पुष्टी देणारी एक पोस्ट सध्या धुमाकुळ घालते आहे. त्यानुसार करोना येणार असे भाकित 2013 मध्येच वर्तवले गेल्याचे दिसून येते आहे.
3 जून 2013 रोजी मार्को ऍक्रॉटिस या ट्वीटर हॅंडलवरून एक ट्वीट करण्यात आले होते. करोना व्हायरस येतो आहे असे त्यात म्हटले होते. त्यामुळे हे ट्वीट कोणी केले, त्याला करोनाची 2013 मध्ये कशी माहिती होती, आठ वर्षांपूर्वीच हे भाकित कसे करण्यात आले असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून त्यावर आता चर्चा सुरू आहे. दरम्यान, काही माध्यमांनी या ट्वीटर अकाऊंटचा मागोवा घेतला असता त्यावरून 11 डिसेंबर 2016 रोजी शेवटचे ट्वीट करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
हा खोडसाळपणा आहे का, की भीषण वास्तव, मोठा कट, कारस्थान असे अनेक कंगोरे या ट्वीटमुळे आता उपस्थित झाले आहेत. संबंधित अकाऊंट हॅक करून जुन्या तारखेने ट्वीट केले असावे असा दावा करण्यात आला आहे. तर तज्ञांच्या म्हणण्यानुसार असे जुन्या तारखेने काही करता येत नाही. पण हे ट्वीट उजेडात आल्यामुळे खळबळ उडाली आहे हे मात्र नक्की. त्यावर येत्या काही दिवसांत आणखी काही प्रकाश पडण्याची शक्यता आहे.