सूरत – एका रूग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने 16 करोनाबाधितांना इतर रूग्णालयांत हलवण्यात आले. सुदैवाने आगीतून बचावलेल्यांपैकी चौघांचे दुर्दैवाने निधन झाले. ती घटना गुजरातच्या सूरतमध्ये घडली.
सूरतमधील आयूष रूग्णालयाच्या आयसीयू वॉर्डला रविवारी रात्री आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेतले. आग लागलेल्या वॉर्डात दाखल असलेल्या रूग्णांना इतर रूग्णालयांत हलवण्यात आले. त्यातील चौघांची प्राणज्योत दोन रूग्णालयांत उपचार चालू असताना मालवली. इतर रूग्णालयांत हलवण्याआधी त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे आगीनंतर त्यांना इतरत्र हलवण्यात आल्याने त्यांच्या नातलगांबरोबरच सरकारी यंत्रणांनाही सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, त्यांचे प्राण वाचू न शकल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.