करोनाच्या उद्रेकात 700 नागरिकांची 62 दिवसांच्या जेवणाची केली सोय
पुणे(प्रतिनिधी) – शहरातील मध्यवर्ती भागातील परिसरात मोठ्या प्रमाणात करोनाचा उद्रेक होता. यामुळे हा परिसर अनेक दिवस सील करण्यात आला होता. समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही करोनाचे 100 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले होते. यामुळे येथेही जीवनावश्यक सेवा वगळता व्यवहार बंद करुन परिसर सील केला गेला होता. मात्र परिसर सील झाल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे खाण्यापिण्याचे हाल होत होते. सुरवातीला काही समाजसेवक, कार्यकर्ते यांनी मदत केली. मात्र नंतर अशा नागरिकांकडे कोणी लक्ष देईनासे झाले. यामुळे नागरिकांनी अखेर समर्थ पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई निलेश साबळे यांच्याशी संपर्क साधला.
साबळे यांनी नागरिकांची समस्या लक्षात घेऊन करोनाचा उद्रेक असलेल्या परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी विविध स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधत तब्बल 700 नागरिकांची 62 दिवसांच्या जेवणाची सोय केली. यासाठी त्यांना त्यांच्या इतर सहकार्यांची देखील मौलाची साथ लाभली. इतरांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा, तुमचा स्व: तुम्हाला सापडेल या गांधीजींच्या वक्तव्याप्रमाणे त्यांनी स्वत:ला समाजसेवेत झोकून दिले होते.
समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंजुळाबाई चाळ, एसआरए भवानी पेठ या ठिकाणी तब्बल 100 करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. यामुळे हा परिसर अनेक दिवस बंद करण्यात आला होता. कंटेनमेंट झोन जाहीर करत येथील व्यवहार आणि वावरण्यावर कडक बंधणे घालण्यात आली होती. मात्र हातावर पोट असणाऱ्यांचे काही दिवसांतच राशनपाणी आणी जवळील पैसे संपल्याने हाल होत होते. यातील काहींनी शेवटचा पर्याय म्हणून पोलिस शिपाई निलेश साबळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना अडचणींची माहिती दिली.
साबळे यांनी परिस्थितीच गांभीर्य ओळखत करोना विषाणूचा उद्रेक असतानाही जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीला धाव घेतली. त्यांनी तातडीने माहेश्वरी समाज, श्रीराम मंदीर(रविवार पेठ) यांच्याशी संपर्क साधून दैनंदिन 700 लोखांची 62 दिवसांच्या जेवणाची सोय केली. हे जेवणाची पार्सल ते आपल्या सहकाऱ्यांसह कंटेनमेंट झोनमध्ये सकाळ संध्याकाळ वाटत होते. तसेच नॅसकॉम संस्थेतर्फे उपलब्ध झालेले राशन किट, सॅनिटायझर आणि मासस्कचेही वाटप त्यांनी केले. स्थानिक नागरिकांनी साबळे आणि पोलिस ठाण्याच्या कार्याला सलाम केला आहे.