पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी दि. २९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मैदान आणि मार्गांची पाहणी केली. यामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकूण आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोहगाव विमानतळावर उतरल्यावर तेथून वाहनाद्वारे स. प. महाविद्यालयात येणार आहेत. तसेच त्यांचा एक दिवस मुक्कामही पुणे शहरात असेल. या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पुणे शहरात मागील काही दिवसांत दहशतवाद्यांचा असलेला वावर आणि उघडकीस आलेला कट लक्षात घेता हा बंदोबस्त अधिक तगडा असेल.
यामध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दल, श्वान पथक यांचा समावेश असणार आहे. तसेच अन्य जिल्ह्यांतून पाच जादा तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. याबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणाही बंदोबस्तात असतील.
मोदींच्या सभेला भाजपने सुमारे ६० हजार नागरिक जमण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार पार्किंग आणि वाहतूक मार्गांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच सभास्थानी मोबाइल व्यतिरीक्त कोणतीही वस्तू नेण्यास प्रतिबंध केला जाणार असल्याचे पोलीस आयुक्तालयातून सांगण्यात आले.