चीनची घुसखोरी मोदींना अद्यापही अमान्य- पृथ्वीराज चव्हाण

गलवान खोऱ्यात किती हल्ले झाले?

मुंबई: चिनी सैनिक मागे सरकण्याऐवजी पेट्रोलिंग पॉईंट 14 आणि गलवान नदी खोऱ्यात तंबू बांधण्याचे काम वेगाने करत आहेत. ही माहिती सॅटेलाईटच्या छायाचित्रांमधून मिळाली आहे. पूर्व लडाखच्या एकूण क्षेत्रामध्ये चीनचा तोफखाना आणि आर्म रेजिमेंट यासह जवळपास 10 हजार सैनिक असल्याचे स्पष्ट होत आहे. ही माहिती खरी आहे का? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झडपमध्ये भारताच्या शहीद जवानांना कॉंग्रेसकडून श्रद्धांजली वाहिली गेली. कॉंग्रेसकडून आज “शहिदों को सलाम दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान, महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत-चीन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारवर निशाणा साधला.

चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने कर्नल संतोष बाबू यांच्यासह 16 जवानांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे आदरपूर्ण स्मरण करत कृतज्ञतेच्या भावनेने आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत.

कॉंग्रेस पक्षाचा शहिदांच्या कर्तृत्वाला सलाम आहे. देशाच्या संरक्षण संदर्भात सरकारकडून घेण्यात येणाऱ्या सर्व निर्णयांचे समर्थन करण्याचे अभिवचन कॉंग्रेस पक्षाने केंद्रीय पातळीवर दिले आहे.

लडाखच्या गलवानमधील खोऱ्यात चीनने केलेल्या अतिक्रमणाबद्दल आम्हाला चिंता आहे. चीनने केलेली घुसखोरी आम्हाला कदापि मान्य नाही. कॉंग्रेस पक्षाने मे महिन्यापासून चिनी घुसखोरीचा मुद्दा मांडला.

मात्र, सरकार आणि त्यांचे मित्रपक्ष आमच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याऐवजी दिशाभूल करणाऱ्यात मग्न आहेत. आपल्या देशाच्या भूमीचं संरक्षण करणे आणि चिनी सैनिकांची घुसखोरी थांबवणे हे केंद्र सरकारचे आद्य कर्तव्य आहे. ते घटनात्मक कर्तव्य आहे.

सरकारमध्ये असणारा विरोधाभस स्पष्ट झाला आहे. 3, 17 आणि 20 जून रोजी संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, परराष्ट्र खातं यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अधिकृत वक्तव्ये केलेली आहेत. चिनी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. भारताच्या गस्त घालण्याच्या कामातही अडथळा निर्माण केला जात आहे. 6 जून 2020 पर्यंत प्रत्यक्ष ताबा रेषेस भारताच्या बाजूला गलवान खोऱ्यात बांधकाम केले गेले आहे, हे सर्व अधिकृत वक्तव्य आहेत.

हे सर्व अधिकृत वक्तव्य असताना विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक गंभीर वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे चीनने भारताच्या पंतप्रधानांचे कौतुक केले. त्यांनी जगाला सांगितले की, भारताचे पंतप्रधान स्वत: सांगत आहेत की, चीनने कुठलेही अतिक्रमण केलेले नाही. मोदी चीनमध्ये फार लोकप्रिय झाले आहेत, असेही समजत आहे. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा पूरेपूर फायदा चीन सरकारने घेतला आहे, असेही चव्हाण म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.