प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा.
वेल्हे(प्रतिनिधी)- वरसगांव (ता.वेल्हे) गोरडवाडी येथील अंगणवाडी सेविकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित महिलेला स्थानिक संसर्ग झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या महिलेने मार्चच्या पंधरवड्यात मुंबईतील वाशी येथे विवाह समारंभासाठी गेली होती. तिने मुंबईतील वाशी ते पुण्याजवळील वेल्हे तालुक्यातील वरसगांव येथे प्रवास केल्याचे आढळून आले आहे. कोरोनाने वेल्हे तालुक्यात शिरकाव केला असून वेल्हे तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
संबंधित महिलेने केलेला प्रवास:
३ मार्च : पतीसह टॅक्सीने सिंहगड रोडवरून वाशी येथे लग्नाला गेली. तिथे सुमारे दीड हजार वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते.
४ मार्च: तिथून ते त्याच टॅक्सीने पुण्यात परतले. संबंधित टॅक्सी चालकाने ३ मार्चपूर्वी कोणत्याही परदेशातून आलेल्या प्रवाशाला घेतलेले नव्हते.
६ मार्च : वेल्हे येथील पंचायत समितीमध्ये मिटींगसाठी गेली. तिथे मिटींगमध्ये उपस्थित असणाऱ्या अंगणवाडी सेविका व शिक्षक व तसेच इतरांशी संपर्क झाला.
७ मार्च : ती महिला घरीच होती. तिला कोणतीही लक्षणं नव्हती.
8 मार्च : खोकल्याचा त्रास जाणवू लागला पण ती दिवसभर घरीच राहिली.
९ मार्च : ताप आल्याने जवळच्या पानशेत येथील क्लिनिक मध्ये जाऊन औषधे घेतली.
१०- ११ मार्च : खोकल्यामध्ये वाढ झाली.
१२-१३ मार्च : तरीही ती पानशेत परिसरात एका जीपने गेली. तिथून वरसगांव येथील गोरडवाडीतील काही जणांना भेटली. यानंतर दुसर्या दिवशीही जीपने वरसगाव गाठले तर येताना ती एसटी बसने आली.
१६ मार्च : तेरा ते चौदा मार्चला त्रास वाढल्यामुळे भारतीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे एक्स-रे काढल्यानंतर त्यात निमोनिया असल्याचे निदान झाले. त्यामुळे स्वाईन फ्लूची शक्यता गृहीत धरून तिचे नमुने ‘एनआयव्ही’ मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. या तपासणीत तिला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
२१ मार्च : यानंतर वरसगांव येथील गोरडवाडी येथे वेल्हे तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी, तलाठी , ग्रामसेवक, सरपंच यांनी संपूर्ण गावात पाहणी करून संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्या १० ते १५ जणांची तपासणी करून हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारले असून घरी राहण्याचा सल्ला दिला आहे.