मुंबई : करोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट एक्सई मुंबईमध्ये सापडला आहे. बृहन्मुंबई महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कप्पा व्हेरिएंटची बाधा झालेला एक रुग्णही सापडला आहे, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. या दोन्ही नवीन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आतापर्यंत सापडलेली नाहीत.
या दोन्ही व्हेरिएंटची प्रसार क्षमता आतापर्यंतच्या व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक असल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यातच व्यक्त केली आहे.
मुंबईतील 230 रुग्णांचे नमुने जिनॉम सिक्वेन्सिंगसाठी पाठवून देण्यात आले होते. त्यातील 228 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर एकाला “कप्पा’ आणि आणखीन एकाला “एक्सई’ व्हेरिएंटची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये नवीन व्हेरिएंट सर्वप्रथम सापडला होता. “एक्सई’ हा व्हेरिएंट सर्वप्रथम 19 जानेवारीला सापडला होता, असे ब्रिटनच्या आरोग्य एजन्सीने 3 एप्रिल रोजी म्हटले होते. ब्रिटनमध्ये आतापर्यंत या नव्या व्हेरिएंटची लागण झालेले 637 रुग्ण सापडले आहेत.
“एक्सई’ हा व्हेरिएंट पूर्वीच्या “बीए 1′ आणि “बीए 2′ या ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटचेच बदललेले स्वरुप आहे. करोनाच्या एकापेक्षा अधिक व्हेरिएंटची लागण झाल्यावर असा स्वरुप बदललेला व्हेरिएंट तयार होत असतो. हे व्हेरिएंट एकत्र होतात तेंव्हा त्यांच्या गुणांची संयुगे तयार होत असतात, असे ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधामध्ये तज्ज्ञांनी म्हटले आहे.