‘ती’ मागणी मान्य झाल्याने रोहित पवारांकडून लोकसेवा आयोगाचे आभार

पुणे – “करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा आता 26 एप्रिल आणि 10 मे रोजी होणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्याने रोहित पवार यांनी आयोगाचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटर खात्याद्वारे त्यांनी लोकसेवा आयोगाचे आभार मानताना राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्ववभूमीवर तरुणांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

‘कोरोनाची लागण होण्याची भीती असल्याने तरुणांनी गावाकडे जाण्यासाठी गर्दी करणे टाळून, आहे तिथेच राहावे. शहरातील नागरिकांनी देखील या तरुणांना मदत करावी’ असे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.

तत्पूर्वी, राज्यामध्ये कोरोना विषाणूचा धोका वाढत असताना रोहित पवार यांनी लोकसेवा आयोगाकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला आता लोकसेवा आयोगाच्या निर्णयामुळे यश आले असून राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचा जीव देखील भांड्यात पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.