महाराष्ट्रात करोना का वाढतोय? ३० जिल्ह्यांच्या भेटींनंतर केंद्रीय पथकांनी सांगितली कारणे

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशातील करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये दिवसाला आढळणाऱ्या बाधितांचा आकडा रोज एक नवा विक्रम करत असून रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र, छत्तीसगड व पंजाब आघाडीवर आहेत. या तीन राज्यांतील ५० जिल्ह्यांमध्ये करोना विषाणू संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी आता येथील वाढत्या रुग्णसंख्येमागील कारणे सांगितली आहेत.

या तीन राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांची कमतरता, विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा अभाव व आरोग्यकर्मींचा तुटवडा ही रुग्णवाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे केंद्रीय पथकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील सातारा, सांगली व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये परिमिती नियंत्रण आणि सक्रिय देखरेखीचा अभाव असल्याचे केंद्रीय पथकांनी जारी केलेल्या वक्तव्यामध्ये म्हटले आहे. याखेरीज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोव्हीड चाचणी यंत्रणांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण आल्याने चाचण्यांचा निकाल येण्यासाठी विलंब होत असून करोना संबंधीच्या सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करण्यात येत नसल्याचे केंद्रीय पथकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

देशातील एकूण सक्रिय बाधितांपैकी ४८.५७ टक्के बाधित असलेल्या महाराष्ट्रात केंद्रीय पथकांनी ३० जिल्ह्यांना भेटी दिल्या. यानंतर ही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.

या केंद्रीय पथकांनी पंजाब येथील ९ जिल्ह्यांना भेटी दिल्या असून येथील रुग्णवाढीसाठी चाचण्यांचे अल्प प्रमाण, कोव्हीड केअर केंद्र व कोव्हीड रुग्णालयांचा अभाव, आरोग्यकर्मींची कमतरता ही करणे दिली आहेत. पटियाला आणि लुधियाना येथे लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्राकडे लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी केली होती.

छत्तीसगड येथील आरोग्यकर्मींवरील  हल्ल्यांच्या घटनांबाबत केंद्रीय पथकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून याबाबत तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे. देशातील एकूण सक्रिय बाधितांपैकी ७०.८२ टक्के बाधित असलेल्या पाच राज्यांपैकी छत्तीसगड हे एक राज्य आहे. राज्यात  परिमिती नियंत्रण योग्य रीतीने करण्यात येत नसल्याने येथील रुग्ण वाढत असल्याचेही या वक्तव्याद्वारे सांगण्यात आलंय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.