Corona virus : पुन्हा एकदा करोनाच्या JN.1 या नवीन प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ख्रिसमस आणि नवनर्षाच्या स्वागतावर करोनाच्या नवीन प्रकाराचे सावट असल्याचे दिसून येत आहे. अनेक लोक याला करोनाच्या नव्या लाटेची सुरुवात मानत असताना आरोग्य तज्ज्ञांनी याविषयी महत्वाचे विधान केले आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने याला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट असे म्हटले आहे.
करोना विषाणूचा नवीन उपपक्रार असलेल्या ‘जेएन.1’चे रुग्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये जेएन.1 बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत.
दुसऱ्या बाजूला देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. संपूर्ण भारतात शुक्रवारी दुपारपर्यंत 640 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या केरळ राज्यात गेल्या 24 तासांत 265 करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
तसेच एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यूदेखील झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत देशभरात एकूण 328 करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 265 रुग्ण केरळमधले आहेत.
दरम्यान, ‘जेएन.1’चा एक रुग्ण सिंधुदुर्गात सापडल्याने महाराष्ट्रातही खळबळ उडाली आहे. या नव्या उपप्रकाराशी सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असला तरी मागील महिनाभरापासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
राज्यात मागील चार आठवड्यांमध्ये म्हणजेच 24 नोव्हेंबरपासून आतापर्यंत तब्बल 102 रुग्ण आढळले आहेत. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चौथ्या आठवड्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येत चार पटीने वाढ झाली आहे.
राज्यातील आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर
आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची पुण्यात ऑनलाईन बैठक पार पडली. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि राज्यातील आरोग्य अधिकारी उपस्थित होते. करोना लस न घेतलेल्या नागरिकांची यादी, रुग्णालयातील बेड ची व्यवस्था, औषदांचा साठा यासह इतर आरोग्य यंत्रणांचा आढावा या बैठकीतून घेतला जात आहे. राज्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी,जिल्हा आरोग्य प्रमुख, जिल्हा शल्य चिकित्सक, पालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी बैठीकीला उपस्थितीत होते.