शिरूर (प्रतिनिधी) – कारेगाव मधील एक वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने व शहराजवळील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एक दिवस तिच्यावर उपचार झाल्याने तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत या रुग्ण महिलेचा मुलगा कामाला असून तेथून शेकडो कामगार शिरूरला ये-जा करीत आहेत या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील पाच (16 मे ते 20 मे )दिवस शिरूर शहर पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय शिरूर नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी, शहरातील व्यापारी, नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्या माध्यमातून घेण्यात आला असल्याचे शिरूर नगरपालिका मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
बाबूराव नगर येथील नागरिक व कारेगाव येथील नागरिक यांचा मोठा वावर शिरूर शहराशी असल्याने सतर्कता म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे रोकडे यांनी सांगितले.
कारेगाव येथील ८० वर्षीय महिला कोराना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. छातीत दुखत असल्याने या महिलेस ९ मे रोजी बाबूराव नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना अहमदनगर व त्यानंतर पुणे येथे उपचारार्थ हलवण्यात आले. तेथे त्यांची कोराना टेस्ट पॉझिटीव्ह आली. शिरूर शहर आणि बाबूराव नगर येथील खाजगी दवाखान्यातील व परिसरातील नागरिकांचा मोठा संपर्क शहराशी सुरू असल्याने यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, मेडिकल स्टोअर्समधील कर्मचारी, शिरूरमधून रुग्णालयात जाणारे इतर असे एकूण अठरा जणांना 14 दिवस रुग्णालयातच क्वारंटाईन करण्यात आल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.
शहरातील ही परिस्थिती पाहता शहरात भीतीचे वातावरण वातावरण असून सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली. कोरोना दाराजवळ येऊन पोचल्याने त्याला दूर ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे होते. त्यानुसार उद्यापासून पाच दिवस काही ठराविक मेडिकलची दुकाने वगळता शहर पूर्ण बंद राहणार आहे.
कारेगाव येथील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाचा मुलगा रांजणगांव औद्योगिक वसाहतीत कंपनीत कामाला आहे. शिरूर शहरातील अनेक तरुण या कंपनीत कामगार आहेत. यामुळे शिरूरकरांची चिंता वाढली आहे. अशातच पुढील पाच दिवस नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे या पाच दिवसाच्या काळात नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.