लंडन, दि. 30- लस घेतल्यावर संसर्गाचा वेग 49 टक्क्यांवर येत असल्याचा दावा ब्रिटनमधील पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) यांच्या संशोधनातून करण्यात आला आहे. लसीबाबत करण्यात आलेल्या संशोधनाचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. लसीकरणातून हर्ड इम्युनिटी विकसित करण्यासाठीही मदत मिळू शकते, असे यातून लक्षात येते.
लस घेतल्यानंतर व्यक्ती संसर्गापासून वाचते व इतरांनाही बाधित करत नाही. म्हणजेच व्यक्तीद्वारे विषाणू इतर व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची शक्यता जवळपास नाही, असे याबाबत तज्ज्ञांनी म्हटले आहे.
लस घेतल्यानंतर व्यक्तीला स्वत:लादेखील संसर्ग होण्याची शक्यता शिल्लक राहत नाही. असे असले तरी शारीरिक अंतर, मास्क व सॅनिटायझेशन इत्यादी गोष्टींचे पालन केले पाहिजे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक म्हणाले, विषाणूपासून बचावाचा सर्वात चांगला उपाय केवळ लस आहे. लसीतून विषाणू संसर्गाची साखळीदेखील खंडित करण्यात यश मिळाले आहे. म्हणूनच लसीचे दोन्ही डोस घेतले पाहिजेत.
लसीकरणाबाबत लॅंसेटमध्ये एक संशोधन प्रकाशित झाले. किंग्ज कॉलेज लंडनच्या संशोधनानुसार चारपैकी एका व्यक्तीला लसीकरणानंतर डोकेदुखी, थकवा किंवा काही सामान्य स्वरूपातील साइड इफेक्ट दिसतात. हे साइड इफेक्ट चोवीस तासांत आपोआप बरे होतात. ते एक किंवा दोन दिवसांपर्यंत राहू शकतात.
पीएचई संशोधनानुसार व्यक्तीने एक डोस घेतल्यानंतरही इतरांना बाधित करण्याची शक्यता 50 टक्के घटते. 57 हजार लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनानंतर ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. एक डोस घेतलेले 38 टक्के लोक तीन आठवड्यांनंतर बाधित झाले. लसीकरणाच्या दोन आठवड्यांनंतर प्रत्येक वयोगटात हा अभ्यास करण्यात आला.
संशोधनाचा संपूर्ण तपशील अद्याप जाहीर झालेला नाही. लवकरच तोही जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. परंतु तूर्तास तरी लसीबाबत संशोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे.