पुणे – शहरात करोनाच्या तिसऱ्या लाटेने अवघ्या दोन आठवड्यांतच दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक दैनंदिन बाधित दर गाठला आहे. मनपा आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दि.13 जानेवारीला हा दर शहरात 28.4 टक्के होता. त्यामुळे शहरातील रुग्ण दुप्पट होण्याच्या दिवसांचे प्रमाण आता 98 दिवसांवर आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी हे प्रमाण जवळपास तीन ते चार वर्षे एवढे होते.
शहरात सक्रीय बाधितांचा आकडाही 25 हजारांच्यावर गेला आहे. शहरात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून अचानक करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिवसाला 70 ते 80 रुग्ण आढळून येत असतानाच हे नवीन बाधितांचे प्रमाण दिवसाला पाच हजारांवर पोहचले आहे.
विशेषत: शहरात गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध आणण्यात आले असले तरी, गर्दीचा भाग वगळता शहरातील उच्चभ्रू सोसायट्या असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन बाधित आढळत आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे, 25 हजार सक्रीय बाधितांमधील अवघे 536 रुग्ण रूग्णालयात उपचार घेत असून त्यात,
शासकीय रुग्णालयात 128 तर उर्वरित खासगी रुग्णालयात 408 जण उपचार घेत आहेत. तर, 1 जानेवारीपासून जवळपास 22 हजार नवे बाधित सापडले असून त्यातील अवघ्या 11 जणांना ऑक्सिजनची गरज भासली आहे. तर, शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के आहे.