होबार्ट – ऍशेस कसोटी मालिकेतील पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या त्रिशतकी धावांच्या समोर इंग्लंडची पहिल्या डावात पुन्हा एकदा वाताहत झाली. त्यांचा पहिला डाव 188 धावांवर संपला व ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळाली. मात्र, दुसरा डाव सुरू केल्यावर ऑस्ट्रेलियाचीही अवस्था 3 बाद 37 अशी बिकट झाली असून त्यांच्याकडे एकूण आघाडी 157 धावांची आहे.
पहिल्या दिवसाच्या 3 बाद 241 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर ऍलेक्स केरी व नाथन लियॉन यांनी संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड व मार्क वुड यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यांना साथ देताना ओली रॉबिन्सन व ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
इंग्लंडने आपला पहिला डाव सुरू झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. प्रमुख फलंदाजांनीही निराशा केली. ख्रिस वोक्सने 36 तर, कर्णधार ज्यो रूटने 34, सॅम बिलिंग्ज 29 व डेव्हीड मलान 25 यांनी थोडीफार चमक दाखवली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने 4 गडी बाद केले. मिशेल स्टार्कने 3 बळी घेतले. इंग्लंडचा पहिला डाव 188 धावांवर संपुष्टात आणताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 115 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
त्यानंतर मात्र, ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव सुरू केल्यावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांच्यावर वर्चस्व राखताना दुसरा दिवस संपताना 3 गडी गमावून 37 धावा अशी स्थिती बनली आहे. खेळ थांबला तेव्हा स्टिव्हन स्मिथ 17 व स्कॉट बोलंड 3 धावांवर खेळत आहेत. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स व मार्क वूड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 3 बाद 37, एकूण 152 धावांची आघाडी
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 75.4 षटकांत सर्वबाद 303 धावा. इंग्लंड पहिला डाव – 47.4 षटकांत सर्वबाद 188 धावा. (ख्रिस वोक्स 36, ज्यो रुट 34, सॅम बिलिंग्ज 29, डेव्हीड मलान 25, पॅट कमिन्स 4-45, मिशेल स्टार्क 3-53). ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 19 षटकांत 3 बाद 37 धावा. (उस्मान ख्वाजा 11, स्टिव्हन स्मिथ खेळत आहे 17, स्कॉट बोलंड खेळत आहे 3, स्टुअर्ट ब्रॉड 1-9, मार्क वुड 1-9, ख्रिस वोक्स 1-13).