नगर -जिल्हा रुग्णालयातील करोना चाचणी यंत्र आणण्यात आले असून, पुढील काही दिवसात नगरमध्ये देखील करोनाची तपासणी करणे शक्य होणार आहे. ज्यामुळे यापुढे चाचणी नमुने पुणे येथे पाठवण्याची आवश्यकता भासणार नाही. व वेळेची बचत होऊन त्वरित उपचार करण्यास मदत होईल. नगरमधील नागरिकांच्या व वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने ही अतिशय दिलासादायक बाब आहे, असे खासदार सुजय विखे यांनी सांगितले.
जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय उपाययोजनांची माहिती खासदार सुजय विखे यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर व इतर आरोग्य अधिकारी उपस्थित होते.खा. विखे म्हणाले की, नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापन सुसज्ज असावे व त्याची खातरजमा करावी, अशी सूचना यावेळी उपस्थित डॉक्टर्स व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.