शिक्रापूर -येथील मुख्य चौकातून जाणारा पुणे नगर महामार्ग नेहमी वाहनकोंडीमुळे चर्चेत असतो. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतलेला असताना, आता पुन्हा या रस्त्यावर वाहनकोंडी होत असल्याने महामार्गाचा श्वास कोंडू लागला आहे.
सध्या लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असून गावी जाण्यास काही अटी व शर्थींवर परवानगी दिली आहे. त्यामुळे परप्रांतीयांना घेऊन जाणाऱ्या ट्रक, टेम्पोची संख्या रस्त्यावर वाढली असून अनेज जण विना परवानगीने जात असल्याने ते रोखण्यासाठी या वाहनांची तपासणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून त्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी लावलेली आहे.
ही तपासणी सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे, त्यामुळे पुणे-नगर महामार्गावरून गायब झालेली वाहनकोंडी पुन्हा दिसू लागली आहे, बुधवारी (दि. 13) रात्रीपासून गुरुवारी (दि. 14) सकाळपर्यंत शिक्रापूर येथील चाकण चौकामध्ये पुणे-नगरसह शिक्रापूर चाकण रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या त्यामुळे चर्चेतून गायब झालेला वाहनकोंडीचा शिक्रापूर रस्ता पुन्हा चर्चेत आला आहे.