संपर्कात आलेल्या 21 जणांना टेस्टसाठी पुण्यात पाठवले ः नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
शिरूर/शिक्रापूर – सणसवाडी येथे करोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण आढळल्याने शिक्रापूर, सणसवाडी ते पुण्यापर्यंत सर्व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. हा नागरिक कुठे परदेशात गेला नसल्याने या नागरिकाला नक्की कोठून करोना व्हायरसची लागण झाली आहे, याचा शोध सुरू आहे. या नागरिकांच्या संपर्कात आलेले 21 जणांना करोनो टेस्ट करण्यासाठी पुणे येथील नायडू हॉस्पिटल येथे पाठवले असल्याचे शिरूरच्या तहसीलदार लैला शेख व शिरूर प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
सणसवाडी येथील या व्यक्तिला गेल्या आठवड्यात अपघात झाला होता. त्यावेळी त्याला शिक्रापूर येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या पायाचे हाड गंभीर असल्याचे समोर आल्याने त्यास नातेवाइकांनी शिक्रापूर येथीलच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दोन दिवस उपचारानंतर त्याला पुणे येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याला करोनाची लक्षणे दिसून आली. त्याच्या तपासण्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो करोना पॉझिटिव्ह आढळून आला.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, आरोग्य पर्यवेक्षक सुरेश लवांडे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशिद, तळेगाव ढमढेरे ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा यांसह आदींनी सणसवाडी येथे हा रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी धाव घेत पाहणी करून त्याला भेटणाऱ्या घरातील सर्व नातेवाइकांची तपासणी केली. त्यांच्यासह कुटुंबातील पाच जणांना पुणे येथील नायडू हॉस्पिटल येथे तपासणीसाठी नेण्यात आले आहे.
सणसवाडी येथे रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणापासून काही परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आलेली आहे. पुढील काही काळ देखील येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार आहे असून, पोलिसांनाकडून देखील विशेष काळजी घेत या परिसरामध्ये नागरिकांना फिरू देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची तपासणी करून त्यांच्यावर आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवणार आहोत.
-डॉ. राजेंद्र शिंदे,
शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे; परंतु नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करण्यात येईल.
-सदाशिव शेलार,
पोलीस निरीक्षक शिक्रापूर
शिक्रापूरचे ते दोन हॉस्पिटल बंद
सणसवाडी येथील या रुग्णाला शिक्रापूर येथे उपचार घेत असलेले दोन हॉस्पिटल बंद करण्यात आले आहेत. मात्र या दोन्ही हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आम्ही काळजी आणि खबरदारी म्हणून हॉस्पिटल बंद ठेवले असून आम्ही इतर तपासणी करून घेत असल्याचे सांगण्यात आले.