शहरातील रुग्णांचा आकडा 4 हजारांच्या वर
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52%
पुणे – शहरातील करोनाबाधितांची संख्या दिवसाला 200 च्यावर गेली असली, तरी शहरातील रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आता 16 दिवसांवर गेला आहे. शहरात दि. 6 मे रोजी सुमारे रुग्णांचा आकडा 2 हजार होता. तो 22 मे रोजी 4 हजारांवर वर गेला आहे.
करोनाचे रुग्ण सापडणे सुरू झाल्यानंतर त्यांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 4 दिवस, पाच दिवस, आठ दिवस अकरा दिवस तसेच यापूर्वी तो 11 दिवसांवर गेला होता. मात्र, आता तो 16 दिवस झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शहरासाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.
तर या साथीला अटकाव करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, त्यामुळे बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, त्याच वेळी शहरात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय असून एकूण रुग्णांपैकी सुमारे 52 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर शहराचा मृत्यूदर सुमारे साडेपाच टक्के आहे. शहरात आतापर्यंत सुमारे 228 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.