पुणे -“स्वाइन फ्लू’ नव्हे तर करोनाच धोकादायक असल्याचे स्पष्ट आहे. गेल्या वर्षभरात राज्यात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले तर करोनाचे आजही दिवसाला पुणे शहरातच 200 ते 300च्या आसपास रुग्ण आढळत आहे.
कधीकाळी स्वाइन फ्लूचा धसका सर्वजण घेत होते परंतु, स्वाइन फ्लू पेक्षा करोनाच अती धोकदायक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
करोनाने गेल्या 16-17 महिन्यांपासून अक्षरश: थैमान घातले आहे. ताप, सर्दी, खोकला आल्यानंतर त्वरित करोनाची चाचणी करण्याचा सल्ला देशपातळीपासून ते स्थानिक प्रशासन पातळीपर्यंत सर्वच आरोग्य व्यवस्थेने दिला आणि अजूनही देत आहे.
त्यामुळे वरील लक्षणे दिसल्यास नागरिक स्वाइन फ्लूची तपासणी करण्यापेक्षा थेट करोनाचीच टेस्ट करत असल्यामुळे स्वाइन फ्लू आता मागेच पडला आहे. स्वाइन फ्लू आणि करोनाची प्राथमिक लक्षणे जवळपास सारखीच आहेत.
त्यामुळे आधी करोना टेस्ट करणे आणि ती जर निगेटिव्ह असेल तर स्वाइन फ्लू किंवा डेंग्यू याच्या टेस्ट केली जात होती. त्यामुळे स्वाइन फ्लू च्या टेस्टही फारशा झाल्या नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
2011-12च्या काळात “स्वाइन फ्लू’ने असेच थैमान घातले होते. मात्र, त्यावेळी करोना एवढी आपत्कालिन स्थिती नव्हती. त्याची भिती मनात असतानाच करोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे त्याची सध्या एवढी भिती नागरिकांच्या मनांत आहे की, त्याच्यापुढे आता “स्वाइन फ्लू’, “डेंग्यू’ मागेच पडले आहेत.
करोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसल्यास करोनाचीच टेस्ट करण्यात येते. स्वाइन फ्लूची टेस्ट केली जात नाही. त्यामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडल्याची नोंद दोन ठिकाणे वगळता कोठेही नाही. दोन्ही रोगांमधील प्राथमिक लक्षणे जवळपास सारखी आहेत.
– डॉ. प्रदीप आवटे, राज्याच्या साथरोग विभागाचे प्रमुख