शिरूर (प्रतिनिधी)- शहरातील पाषाण मळा जवळील दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या इमारतीमध्ये कंपनी कामगार(40 वर्षीय) पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण सात जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यापैकी हाय रिक्स मधील तीन जणांचे स्बॅव तपासणीसाठी शासकीय रूग्णालयामध्ये पाठवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यामुळे शिरूर परिसरात खळबळ उडाली आहे. शिरूर शहरात अनेक दिवसानंतर पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे.
शिरूर शहरातील पाषाणमळा जवळील इमारतीमध्ये राहणारा आणि रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीतील एका बड्या कंपनीतील कामगार याला 26 आणि 27 जून रोजी त्रास होत असल्याने पुणे येथील केईएम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. काल रात्री उशिरा त्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.
शिरूर नगर परिषदेच्या वतीने कंपनी कामगार राहत असलेल्या पाषाणमळा जवळील इमारतीमध्ये जंतुनाशक फवारणी केली असून या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी मास्क घालावा, सोशल डिस्टन्स पाळावे, कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये, तोंडाला स्पर्श करू नये, सर्दी खोकला ताप असलेल्या रुग्णांपासून दूर राहावे आणि शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.