पिंपरी – राज्यात करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सण, मंगल कार्य, सभा, संमेलनांचे कार्यक्रम, सोहळे रद्द झाले आहेत. केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी आहे. त्यामुळे फुलांची मागणीही घटलेली असून दरही गडगडल्याने फुलशेती उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील चऱ्होली, डुडुळगाव परिसरात फुलशेती केली जाते. याशिवाय मावळ तालुक्यातूनही पिंपरी-चिंचवड शहरात फुलांची आवक होत असते. फूलशेती फायद्याची मानली जाते. दिवाळी, गणपती, नवरात्रौत्सव, दसरा, गुढीपाडवा या सणांनुसार फुलशेतीचे नियोजन केले जाते.
मागणी असलेल्या फुलांचे उत्पादन घेत, हमखास नफा असलेल्या फुलशेतीवर अनेक शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून आहेत. सध्या अष्टर, झेंडू, गुलाबाचे दर कोसळल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. करोनाच्या पहिल्या लॉकडाऊननंतर पूर्ववत झालेल्या व्यवहारचक्रात फायद्याची ठरत असलेली फुलशेती अचानकपणे आता तोट्यात आली आहे.