सुवा – फिजीमध्ये गेल्या वर्षभरापासून करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात यश आले होते. मात्र, आता तेथे करोनाचे बाधित रुग्ण मोठ्या संख्येने सापडायला सुरुवात झाली आहे. त्यातही या रुग्णांमध्ये संसर्ग पसरवणारा विषाणू हा भारतीय व्हेरियंटचा असल्याचे उघड झाल्यापासून फिजीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे फिजीची राजधानी सुवामध्ये लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. फिजीतील आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या नादी शहरामध्ये क्वारंटाइन सेंटरदेखील सुरू करण्यात आले आहे.
विदेशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी करून बाधित प्रवाशांना या क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवून दिले जाऊ लागले आहे. मंगळवारी या क्वारंटाइन सेंटरमध्ये 6 नवीन रुग्ण आले. या रुग्णांना भारतीय व्हेरियंटचा संसर्ग झालेला होता. या विषाणूच्या व्हेरियंटकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा विभागाचे कायम सचिव जेम्स फोंग यांनी सांगितले.
भारताती सध्याची स्थिती पाहत्या भारतीय व्हेरियंटचा संसर्ग जर फिजीमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला तर करोना बाधितांची त्सुनामीच येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
फिजीमध्ये आतापर्यंत कठोर उपाययोजना आणि लॉकडाऊनमुळे करोनाच्या संसर्गाला आटोक्यात ठेवले गेले होते. आतापर्यंत केवळ 109 बाधित सापडले असून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.