बॅंकॉक, दि. 27- थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत चान ओ चा यांना मास्क न लावल्याबद्दल सहा हजार बात म्हणजे जवळपास 14 हजार रुपये दंड ठोठावला गेला आहे. थायलंड सरकार करोनाच्या नव्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी संघर्ष करत आहे. 1मे पासून थायलंडमध्ये देशाच्या नागरिकांव्यतिरिक्त अन्य प्रवाशांवर प्रवेशबंदी घातली गेली असून भारतीय नागरिकांना ही बंदी लागू आहे.
बॅंकॉक पोस्टने दिलेल्या बातमीनुसार सोमवारपासून शहरात मास्क वापर बंधनकारक केला गेला आहे. पंतप्रधान जनरल प्रयुत हे सोमवारी लस खरेदी संदर्भात सल्लागारांबरोबर एक बैठक घेत होते तेव्हा बाकी सदस्यांनी मास्क घातला होता पण पंतप्रधानांनी मास्क घातला नव्हता.
त्यावर बॅंक गव्हर्नर आश्विन क्वानमुआंग यांनी फेसबुकवर मास्क विना असलेल्या पंतप्रधानांचा फोटो शेअर करून पोलिसात त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर सुद्धा पंतप्रधानांच्या विरोधात जोरदार टीका सुरू झाल्यावर शहर अधिकारी जागे झाले आणि त्यांनी पंतप्रधानांना दंड ठोठावला. थायलंडमध्ये सोमवारी करोनाच्या 2048 नव्या केसेस सापडल्या असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे.