दुबई – दुबई-कोझिकोडे विमानाच्या अपघातात मृत्यू पावलेला एक प्रवासी करोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले होते. मात्र या प्रवाशाला पूर्वी संयुक्त अरब अमिरातीमध्ये असतानाच करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचार घेतल्यावर त्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. भारतात निघण्यापूर्वी तो कोविड-निगेटिव्ह झाल्याचे निदान झाले होते.
सुधीर वरियाथ असे या 45 वर्षीय प्रवाशाचे नाव आहे. सुधीर यांना एप्रिलमध्येच करोनाची बाधा झाली होती. त्यांच्यासह एकाच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या अन्य तिघांनाही संसर्ग झाला होता. सुधीर यांना अल वारसन सुविधेमध्ये विलगीकरणात ठेवले आले होते आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते बरे झाले होते, असे त्यांच्याबरोबर एकाच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या प्रशोब थराम्मल कीन यांनी माध्यमांना सांगितले. दुबईतील भारतीय दूतावासाशी संबंधित प्रवीण कुमार या कार्यकर्त्याने या सर्वांना विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था केली होती.
सुधीर यांच्या शरीरात ऍन्टीबॉडीज उत्पन्न झालेल्या असाव्यात. त्यामुळेच त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असावी, असे प्रवीण कुमार यांनी सांगितले. केरळमधील “नॉन रेसिडेन्ट केरलाईट अफेअर्स’ला त्यांनी ही माहिती कळवली.
कोझिकोडेच्या विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेस विमान अपघातग्रस्त झाल्यानंतर जखमी झालेल्या वारियाथ यांचे दोन तासातच निधन झाले होते. विमानाच्या अपघातानंतर मृत घोषित करण्यात आलेले ते अखेरचे प्रवासी होते. अपघातानंतर करण्यात आलेल्या चाचणीदरम्यान त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.
करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाऊ शकला नाही. कोझिकोडे येथील सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.