कवठे -भिवडी, ता. पुरंदर येथे तुपाचा व्यवसाय करणाऱ्या सुरेश गुलाब कदम (वय 59, रा. भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्या दुचाकीला कंटेनरने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वेळे, ता. वाई गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जोराची धडक देऊन तब्बल 100 फूट फरफटत नेल्याने कदम यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरेश कदम हे सोमवारी बजाज डिस्कव्हर मोटारसायकल (एमएच-12-एलएच-4883) वरून सोळशी, ता. कोरेगाव येथून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वेळे, ता. वाई गावच्या हद्दीत चौकातून पुण्याच्या दिशेने वळण घेऊन पुढे जात होते. त्याच वेळी पुणे बाजूकडून कंटेनर (केएल-01-एडी- 2082) भरधाव येत होता.
समोरून अचानक मोटारसायकल आल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि कंटेनरने मोटारसायकलला जोराची धडक दिली. कंटेनरने मोटारसायकला तब्बल 100 फूट फरफटत नेले. या अपघातात मोटारसायकलवरील सुरेश कदम यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक वाहन तेथेच सोडून पळून गेला.
या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्यो सपोनि श्याम बुवा यांनी हवालदार चंद्रकांत मुंगसे, ए. एम. भोसले, व्ही. सी. अवघडे यांना तातडीने अपघातस्थळी पाठवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सुरेश कदम यांचा मृतदेह कवठे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनासाठी नेला.
पोलिसांनी कदम यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधूून अपघाताची माहिती दिली. शवविच्छेदनानंतर कदम यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी कंटेनर जप्त करून तो भुईंज पोलीस ठाण्याच्या आवारात लावला आहे. कंटेनरचालकाचा शोध घेण्यात येत आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.