इंदापूर तालुक्यात करोनाचा प्रवेश
भिगवण (प्रतिनिधी) : इंदापूर तालुका अद्याप कोव्हिड १९ च्या साथीपासून दूर होता. मात्र आजची धक्कादायक बातमी म्हणजे भिगवण परिसरात या आजाराने शिरकाव केला असून एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.
भिगवण परिसरातील एका महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने ती महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात आली होती. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी याबाबत प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये या महिलेस करोनाचे संक्रमण झाल्याचे आढळून आले.
ही महिला बारामती येथे उपचारास गेलेली होती. तिला पुणे येथे उपचारासाठी नेले असता तेथे चाचणी घेण्यात आली. त्यात ही बाब आढळून आली.
भिगवण परिसरात या महिलेने उपचार घेतल्याची माहिती मिळून आली आहे. त्याबाबत दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. भिगवण येथील आरोग्य अधिकारी डॉ. उदावंत यांनी या वृत्तास दुजोरा देताना सांगितले की, एक रुग्ण पोझिटीव अढळल्याने आम्ही तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण परिसरास या साथीस रोखन्याची उपाययोजना तयार करीत आहोत.
दरम्यान शासनाने टाळेबंदीचा निर्णय घेतल्यापासून इंदापूर तालुक्यात अत्यंतिक काळजी घेण्यात येत होती. आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी मोठी काळजी घेत याबाबत उपाययोजना केली होती. पण एक रुग्ण आढळल्याने स्थिती बिकट झाली आहे.