पुणे – शहरातील करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या संख्येने आज तब्बल तीन हजारांचा टप्पा पार केला. गेल्या 24 तासांत 44 करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 3 हजार 7 बाधित मृत्युमुखी पडले आहे. दिवसेंदिवस मृत्युचा वाढता आकडा आणि बाधित संख्येमुळे ही साथ आटोक्यात आणण्यात प्रशासनाला अजूनही यश मिळत नाही.
दोन दिवसांपासून बाधित संख्या दोन हजारांच्या जवळपास असली तरी, करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. शुक्रवारी (दि. 18) दिवसभरात नव्याने 1 हजार 891 बाधित सापडले. तर 1 हजार 926 बाधित करोनातून बरे होवून घरी गेले आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या 1 लाख 28 हजार 423 बाधितांपैकी 1 लाख 8 हजार 123 बाधित करोनामुक्त झाले आहेत. जवळपास 84.20 टक्के बाधित आतापर्यंत घरी गेले आहेत.
दरम्यान, दिवसभरात 6 हजार 289 संशयितांची करोना चाचणी करण्यात आली. शहरात सक्रिय बाधितांची संख्या 17 हजार 293 इतकी असून, त्यातील 961 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामध्ये 493 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. तर 468 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. जवळपास 3 हजार 523 बाधित ऑक्सिजनवर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.