विमा नियंत्रक लवकरच निर्णय घेण्याची शक्यता
नवी दिल्ली – विमा नियंत्रक इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऍथॉरिटी ऑफ इंडिया लवकरच करोनासंबंधातील विम्याची मुदत वाढविण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. करोनावरील लस आणखी दृष्टिपथात नसल्यामुळे ही मुदत वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे विमा नियमन संस्थेचे अध्यक्ष सुभाष कुंटिया त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विमा पॉलिसी साधी आणि सुटसुटीत असावी. ते सर्वसामान्यांना लवकर समजावी, यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे कुंटिया यांनी सांगितले. ते म्हणाले की, ही करोना संबंधातील पॉलिसी काढताना गरजेपेक्षा जास्त कागदपत्रांची जमवाजमव करावी लागणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
करोना संसर्गावरील उपचार करण्यासाठी विमा नियंत्रकाच्या सूचनेनुसार 10 जुलै रोजी सर्वसाधारण आणि आरोग्य विमा कंपन्यांनी कवच नावाची पॉलिसी जारी केली आहे. या पॉलिसीची मुदत साडेतीन आणि साडेनऊ महिने असून पाच लाखांचा विमा उतरविण्यात येतो. मात्र, दरम्यानच्या काळामध्ये लस उपलब्ध होईल असे वाटत होते. आता लस उपलब्ध होणे लांबत चालले आहे. त्यामुळे या पॉलिसीची मुदत वाढविण्याचा शक्यतेवर विचार करण्यात येत आहे, असे कुंटिया यांनी सांगितले. यामुळे आगामी काळातही करोनाबाधित नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
विमा क्षेत्रातील परिस्थितीत सुधारणा
कुंटिया म्हणाले की, एप्रिल महिन्यामध्ये विमा क्षेत्राचा विकास उणे 19.1 टक्के झाला होता. मात्र, नंतर परिस्थितीमध्ये सुधारणा होत असून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीमध्ये या क्षेत्राचा विकासदर 2.1 टक्क्यांवर गेला आहे. अडचणीच्या काळात विमा क्षेत्राला व्यवसायाची संधी मिळते. त्यामुळे विमा कंपन्यांनी या परिस्थितीचा स्वतःच्या आणि ग्राहकांच्या भल्यासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.