पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरपाठोपाठ जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग फोफावला आहे. मागील महिनाभरात तेराही तालुक्यांना करोनाने वेढले असून, त्यामध्ये हवेली तालुक्यात सर्वाधिक बाधित आहेत. ग्रामीण भाग आणि नगरपालिका हद्दीत एकूण 740 करोना बाधित सापडले असून, त्यातील 32 जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांपैकी 469 जणांना घरी सोडण्यात आले असून, 239 जणांवर उपचार सुरू आहेत.
पुणे शहराजवळ असलेला हवेली तालुक्याचा बहुतांश भाग शहर हद्दीत आहे. त्यामुळे या तालुक्यात संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्यामध्ये मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द, खानापूर, हांडेवाडी,जांभुळवाडी, कदमवाक वस्ती, किरकटवाडी, कोल्हेवाडी, लोणीकाळभोर, लोणीकंद, नांदे, कोंढवे धावडे, होळकरवाडी, पिसोळी, उरुळीकांचन, वाघोली, भिलारेवाडी, केसनंद, नऱ्हेगाव, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, अष्टापूर, वडाचीवाडी या गावांचा समावेश आहे.
तसेच पुरंदर, मावळ, वेल्हा, मावळ, मुळशी यासारखे तालुके शहराला लागून आहेत. बारामती-6, भोर-5, दौंड-4, मावळ-11, पुरंदर-7, खेड-15, जुन्नर तालुक्यात 16 गावांमध्ये संसर्ग झाला आहे. मुळशी 8 तर शिरूरमध्ये 12 गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पुरंदर तालुक्यासह भोर, बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यात सर्वाधिक कमी बाधित आढळले आहेत. मात्र, बारामती आणि दौंड तालुक्यातील नगरपालिका हद्दीत अधिक बाधितांची संख्या आहे. सद्यस्थितीत हवेली तालुक्यात सर्वाधिक 220 बाधित सापडले असून, 5 जणांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत 136 जणांना घरी सोडण्यात आले असून, 79 बाधितांवर उपचार सुरू आहे. त्यापाठोपाठ दौंड तालुक्यातील नगरपालिका हद्दीत तब्बल 92 तर जिल्हा परिषद हद्दीत 17 बाधित आहेत.