पुणे – भाव मिळत असल्याने मागील काही कालावधीत कोथिंबीर आणि मेथीची मोठी लागवड झाली. पोषक वातावरणामुळे उत्पादनही मुबलक झाले आहे. त्यामुळे मार्केट यार्ड येथे कोथिंबीर, मेथीची आवक नेहमीच्या तुलनेत दुप्पट होत आहे. त्या तुलनेत मागणी कमी आहे. त्यामुळे कोथिंबीर आणि मेथीच्या भावातही घसरण झाली आहे.
कोथिंबिरीला घाऊक बाजारात जुडीला दर्जानुसार 2 ते 5 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात 5 ते 10 रुपये भावाने विक्री होत आहे. मेथीला घाऊक बाजारात 3 ते 7 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपये जुडी भावाने विक्री होत आहे. महिना ते दीड महिन्यांपूर्वी पालेभाज्यांचे भाव तेजीत होते.
मागणीच्या तुलनेत आवक कमी होती. त्यामुळे भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कोथिंबीर आणि मेथीची बंपर लागवड केली. त्यामुळे आता बाजारात नेहमी लाख ते सव्वा लाख जुडी कोथिंबिरीची आवक होत असते. ती सध्या 2 ते सव्वा दोन लाख जुडी होत आहे. मेथीची ही तिच अवस्था आहे. दररोज 50 ते 60 हजार जुडी आवक होणाऱ्या मेथीची आता 1 लाख जुडी आवक होत आहे.
“बाजारात कोथिंबीर आणि मेथीची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मालाला उठाव नाही. त्यामुळे दोन्हींच्या जुडीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणे अवघड बनले आहे.” – राजेंद्र सूर्यवंशी, व्यापारी, मार्केट यार्ड