ड्रीम प्रोजेक्टसाठी सातशे कोटी रुपयांची तरतूद
राजगुरूनगर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे जाण्यासाठी रस्ता करण्याला वनविभाग व अभयारण्य विभागाची मोठी अडचण होती ती लवकरच दूर होणार असून भोरगिरी ते भीमाशंकर उड्डाणपूल होणार आहे. या ड्रीम प्रोजेक्टसाठी सातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.
राजगुरूनगर येथे उरण – पनवेल – भीमाशंकर – खेड – शिरूर (जुना शिरूर- राजगुरूनगर- भीमाशंकर) या रस्त्याच्या पाबळ रोड ते (राजगुरुनगर) होलेवाडी रस्ता सुधारण्याच्या (दुरुस्तीच्या) कामाचे भूमिपूजन आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते आज (दि. 24) झाले. यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी खेड तालुका राष्टवादी कॉंग्रेस अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, संचालक जयसिंग भोगाडे, माजी सभापती शांताराम चव्हाण, नवनाथ होले, दशरथ गाडे, शहर अध्यक्ष सुभाष होले, युवक अध्यक्ष सागर सातकर, महिला अध्यक्ष संध्या जाधव, मनीषा सांडभोर, ऍड. मनिषा पवळे- टाकळकर, विलास मांजरे, आशा तांबे, गौरव मुटके, माणिक भोगाडे, प्रसाद भोगाडे, मयूर भोगाडे, कैलास टाकळकर, वैभव नाईकरे, सरपंच सोनल होले, उपसरपंच कामिनी होले, महेश होले, रोहिदास होले, नारायण होले, संतोष होले, दिनकर होले सुभाष होले, किरण पवार, पप्पू राक्षे पाटील, नामदेव चव्हाण, संतोष भांगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले, तालुक्याचा विकास आणि पर्यटन वाढण्यासाठी विविध विकासकामे पूर्ण केली जात आहेत.मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यात तालुक्यातील प्रशासकीय इमारतींबाबत लवकरच बैठक होणार आहे. त्यात हा प्रश्न मार्गी लागणार आहे. तहसीलदार कार्यालय इमारत जुनी झाली आहे, तिचे स्ट्रक्चर ऑडिट झाले आहे. त्यांना लवकरच पर्यायी जागा देण्यात येणार आहे.
कोर्टात पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी पार्किंग इमारत बांधली जाणार आहे. राजगुरूनगर, आळंदी, चाकण या शहरातील प्रश्न सोडविण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांत खेड तालुक्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. यावेळी तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नवनाथ होले यांनी केले. रोहिदास होले यांनी आभार मानले.
गावबंदी आदेशाने प्रश्न सुटण्यास अडचणी
लोकांनी कामासाठी, विविध प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला निवडून दिले. त्यांची कामे आम्ही करायला पाहिजेत. जो नेता मराठा आरक्षणाला विरोध करतो त्याबाबत विरोध करणे योग्य; मात्र माझा आरक्षणाला पाठिंबा आहे. तरीही गावबंदी असल्याने अनेक गरजेचे प्रश्न सुटले नाहीत. त्यासाठी असे निर्णय घेणे मला योग्य वाटत नाही, असे आमदार मोहिते यांनी सांगितले.
तक्रार असलेल्या अधिकाऱ्यांना हटवणार
तालुक्याच्या विकासाठी आम्ही अहोरात्र काम करीत असतो. दुर्दैवाने काही अधिकारी तालुक्यात आले आणि त्यांनी तालुका नागवून ठेवला आहे. अनेक अधिकाऱ्यांकडून नागरिकांना त्रास दिला जातो. या अधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत आम्ही भेटून नागरिकांच्या तक्रारी असलेले अधिकाऱ्यांना तालुक्यातून हटविण्यात येणार आहे.
मते न देणाऱ्यांनी उमेदवारीची चिंता करू नये
विरोधकांनी तालुक्याच्या विकासाचे राजकारण करावे. तुम्ही काय दिवा लावला काय लावणार आहे. ते जनतेला सांगावे. मी जे करतो तेच लोकांना सांगतो दुसऱ्यांचे कामाचे श्रेय घेत नाही. मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मोकळा नाही. काहीजण म्हणतात पुढे आमदारकीची निवडणूक लढणार नाही. आमदारकीला एक वर्षे बाकी आहे. ज्यांनी मला मते दिली नाही, त्यांनी एवढी चिंता करण्याचे कारण नाही. तुम्ही मार्केट कमिटीला तरी निवडून येता का, अशी विरोधकांवर मोहिते पाटील यांनी बोचरी टीका केली.