हडपसर – राजकीय मते कितीही वेगळी असली तरी सामाजिक आणि सहकारात काम करताना हडपसरकरांनी ती बाजूला ठेवून सहकारात एकत्र काम केले. येथे अनेक जाणकार मान्यवरांचा खजिना होता. त्यामुळे अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या त्या वाढल्या त्यांतील एक असलेल्या हडपसर भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी सोसायटीचे येथील विकासात महत्त्वाचे योगदान राहिले आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी काढले.
हडपसर भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी सोसायटीच्या अमृत महोत्सव समारंभात शरद पवार बोलत होते. व्यापारी संकुलाचे भूमिपूजन, अमृत स्मृती गौरव अंक प्रकाशन तसेच पवार यांच्या हस्ते डॉ. बाबा आढाव यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी स्वर्गीय रामभाऊ तुपे समाजसेवा पुरस्कार, मगरपट्टा सिटीचे संस्थापक सतीश मगर यांना स्वर्गीय अण्णासाहेब मगर उद्यमशीलता पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, महादेव बाबर, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्तात्रय तुपे, माजी उपमहापौर निलेश मगर, सुभाष काळभोर, अनिल तुपे, रामराव गोगावले, भारती शेवाळे, हडपसर भाजीपाला खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रविण तुपे, व्हाइस चेअरमन साहेबराव काळे, कार्यकारी संचालक जयप्रकाश जाधव, संचालक रमेश घुले, शिवाजी खोमणे, युवराज शेवाळे, जिजाबा बांदल, गोपीचंद माने, रतन काळे, प्रा. जे .पी. देसाई, विजय तुपे, बाळासाहेब गोगावले, राजेंद्र उंद्रे, विठ्ठल सातव, संजीवनी जाधव, सुजित गोगावले, रामदास कसबे, संगीता तुपे, प्रमोद तुपे, शंकर पवार, भाऊसाहेब तुपे आदींसह सभासद व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबा आढाव म्हणाले की, समाजवादी विचारसरणीच्या मंडळींनी सहकार चळवळ रुजविली. सामुहिक शेतीच्या माध्यमातून शेतीबरोबर सहकार, शिक्षण, रुग्णालये उभी राहिली. त्यामुळे हडपसरमध्ये सहकारी संस्था उदयाला आल्या. त्याचे प्रतिक म्हणून हडपसर भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी सोसायटी ७५ वर्षे टिकून आहे. हडपसरमधील नागरिकांना पाण्याचा वापर करून उत्तम शेती करण्याचा मार्ग महात्मा फुले यांनी दाखवून दिला. उपस्थितांचे स्वागत जयप्रकाश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन लगड यांनी केले. सोसायटीचे व्हाइस चेअरमन साहेबराव काळे यांनी आभार मानले.
हडपसरची नवीन महानगरपालिका तयार करा – प्रविण तुपे
हडपसर ते उरुळी कांचन पर्यंत नवीन महापालिका करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी पवार यांना विनंती करून आपल्या प्रास्तविकात बोलताना सोसायटीचे चेअरमन प्रविण तुपे म्हणाले की, स्वर्गीय खासदार अण्णासाहेब मगर यांनी १९४७ साली हडपसर भाजीपाला खरेदी विक्री सहकारी सोसायटीची स्थापना केली. आज ती संस्था अमृत महोत्सव साजरा करत आहे. दुसऱ्या महायुद्धात लष्कराला भाजीपाला पुरवठा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या सोसायटीचे सुमारे दीड हजार सभासद आहेत. सातत्याने ऑडिट वर्ग अ असून सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप करीत आहे. संस्थेचा हडपसर बझार उत्तमरीत्या सुरू आहे. आता अधिक क्षमता असलेल्या व्यापारी संकुलाचे आज भूमिपूजन होत आहे.लवकरच येथे अद्ययावत सुविधांसह व्यापारी संकुल लोकांच्या सेवेसाठी तयार असेल.