पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शहरात मोकळा श्वास अर्थात शुद्ध हवा मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. शहरातील भोसरी परिसरातील हवा सर्वांत जास्त प्रदूषित झाल्याचे दिसून आले आहे. त्याखालोखाल भूमकर चौक आणि निगडीचा क्रमांक लागतो. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.
वाढते वायू प्रदूषणाची दखल घेतली जावी व लोकांना माहिती व्हावी, म्हणून आयआयटीएम पुणे यांनी सफर नावाचे ऍप बनवले आहे. त्यात हवेची गुणवत्ता, आरोग्यासाठी सल्ला आणि धोका काय आहे हे सांगितले जाते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरात अनेक ठिकाणी वायू प्रदूषण दर्शविणारे डिजिटल फलक बसविले आहेत. या दोन्हीचा आढावा घेतला असता शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत असून ती आता आरोग्यास हानिकारक होईल अशा स्तरावर पोहचल्याचे निदर्शनास आले आहे. शेकोट्या, वायू प्रदूषण, घरगुती आणि औद्योगिक घातक कचरा जाळल्याने हवेची गुणवत्ता जास्तच खराब होत आहे. भोसरी परिसर हवेच्या गुणत्ता कायमच ढासळलेली असते.
कृत्रिम फुफ्फुसे पडली काळी
महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात 6 जानेवारीला शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविण्यासाठी कृत्रिम फुफ्फुसे बसविली आहेत. गेल्या 6 ते 27 जानेवारी अवध्या 21 दिवसांमध्ये ती पूर्ण काळी पडली आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्तेने धोक्याची पातळी ओलांडल्याचे दिसून येत आहे.
सफरचे येथे आहेत सेन्सॉर
“सफर’ ऍपवर पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, निगडी, भूमकर चौक या परिसरातील हवेच्या गुणवत्ते विषयी माहिती दिली जाते. त्यात आजच्या दिवशी सर्वाधिक प्रदूषित हवा ही भोसरी येथील दर्शविण्यात आली आहे. आजच्या दिवसाचा एक्यूआय 245 आहे.200 पेक्षा जास्त एक्यूआय असणे म्हणजे प्रदुषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
भोसरी सर्वाधिक प्रदूषित
भोसरी परिसरात एमआयडीसी आहे. या परिसरात अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या, लघुउद्योग आहेत. या परिसरात भंगाराची दुकानेही असल्याने घातक कचरा जाळला जातो. परिणामी वायू प्रदूषणात वाढ होते. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्यात वाहनांची योग्य काळजी न घेतल्याने या परिसरातील हवा जास्त प्रदूषित असल्याचे दिसून येते.
आजचा एक्यूआय
भोसरी – 245
भूमकर चौक – 166
निगडी – 162