नीरा -येथील प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन या प्राथमिक शाळेच्या इमारतीचा बांधकामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे आणि आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. सुमारे दीड कोटी खर्च करून सात वर्गखोल्या येथे बांधण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील पटसंख्येने मोठ्या असलेल्या शाळा क्रमांक एक व दोनची इमारत अनेक वर्षांपासून मोडकळीस आली होती. ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधावी, अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून पालकांनी लावून धरली होती. यासाठी अनेकवेळा आंदोलने केली. पालकांनी मुलांना शाळेत पाठविणेही बंद केले होते. पालकांच्या वेळोवेळी झालेल्या या आंदोलनाला यश आले आहे. या शाळेची नवीन इमारत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधताना शाळेसाठी 22 वर्गखोल्यांची आवश्यकता आहे.
मात्र, तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यावेळी दीड कोटींचा निधी दिला होता. यात बावीस वर्गखोल्या बांधणे अपेक्षित होते. मात्र, येथील जागा व शाळेसाठी आवश्यक असलेल्या वर्गखोल्यांचा विचार करता केवळ सातच वर्गखोल्या बसू शकतात. त्यामुळे सध्या तरी तेवढ्याच खोल्यांच्या बांधकामाला सुरुवात करावी, आणखी वर्ग खोल्यासाठी वाढीव निधी दिला जाईल, असे म्हणत पालकमंत्री अजित पवार यांनी बांधकाम सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार, पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती प्रा. डॉ. गोरखनाथ माने, माजी सभापती अतुल म्हके, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनील कुऱ्हाडे, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, गटशिक्षणाधिकारी गायकवाड, उपअभियंता मखरे, सरपंच दिव्या पवार, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शाखा अभियंता, केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.