वाल्हे, (वार्ताहर)- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सुकलवाडी (ता. पुरंदर ) ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दालन तयार करण्यात आले. असे संविधान दालन तयार करणारी सुकलवाडी ही पुणे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने गावातील विविध समाजघटकातील (विशेषतः वंचित, अल्पसंख्याक) महिलांच्या हस्ते या संविधान दालनाचे उद्घाटन करण्यात आले. मुक्ताबाई देवकुळे, रेश्मा शेख, पवित्रा भोसले, विमल पवार, उर्मिला पवार, हर्षदा पवार, अश्विनी चव्हाण, वैजयंता दाते या महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते या संविधान दालनाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच संदेश पवार, उपसरपंच दत्तात्रय पवार, ग्रामपंचायत सदस्य योगेश पवार, नितिन गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
संविधान दालनात संविधान निर्मितीचा इतिहास, त्याचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व, संविधानिक मुल्ये, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांच्याविषयी सविस्तर माहिती देणारे छायाचिञे प्रदर्शन लावण्यात आले आहे.
संविधाननिर्मितीत सहभाग घेणाऱ्या २५ महिलांची माहिती देणारी दिनदर्शिका, संविधानाबद्दल सविस्तर माहिती देणारी पुस्तके, गुजरातमधून मागविण्यात आलेले संविधानघर, तसेच अशोकस्तंभ आदी गोष्टींचे प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. सरपंच संदेश पवार, संविधान अभ्यासक श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी मार्गदर्शन केले.
हे संविधान दालन तयार करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांच्यासोबत, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, माजी उपसरपंच संतोष पवार, धनंजय परशुराम पवार, संजय चव्हाण, युवा नेते राहुल यादव, संतोष भोसले, नितिन पवार, दिगंबर पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.