अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार
पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत आता महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येणार आहे. या समाविष्ट गावातील कनिष्ठ महाविद्यालयाचे अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाकडून अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे कामकाज 2 जुलैपासून सुरू झाले आहे. सध्या महाविद्यालयांकडून प्रवेशासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना पहिला भाग भरण्यासाठी दि. 15 जुलैपासून अर्ज करता येणार आहे. दुसरा भाग दहावीच्या निकालानंतर भरता येणार आहे.
दरवर्षी महापालिका क्षेत्रापुरती ही ऑनलाइन प्रक्रिया होत असते. मात्र, पुणे महापालिका क्षेत्रात काही नवीन गावे समाविष्ट झाली आहेत. त्यात कळस, धानोरी, लोहगाव (उत्तर), लोहगाव (पूर्व), मुंढवा (केशवनगर पूर्व), हडपसर (साडेसतरानळी), फुरसंगी, उरूळी देवाची दक्षिण पूर्ण (हडपसर), महंमदवाडी, उंड्री, येवलेवाडी, कात्रज, धायरी, वडगाव बुद्रुक आणि खुर्द, शिवणे, बावधन खुर्द, वडगांव खुर्द, बाणेर, बालेवाडी या गावांचा समावेश आहे. आता यापुढे या गावातील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश शालेय शिक्षण विभागाकडून केंद्रीय पद्धतीने होतील. त्यासाठी या गावातील महाविद्यालयांनी ऑनलाइन पद्धतीने अकरावीच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीचे सचिव मीना शेंडकर यांनी दिली.
ऑफलाइन प्रवेश करू नये…
समाविष्ट गावातील कनिष्ठ महाविद्यालयांना अकरावीचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने करता येणार नाही. त्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश करावे लागतील. ऑनलाइन पद्धतीने न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेवर अथवा प्राचार्यांवर राहणार आहे.