नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू होण्याच्या अगोदरच कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी या इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये शाब्दिक युध्द सुरू झाले आहे. अर्थात त्याची सुरूवात आपचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीच केली आहे. त्याला आता कॉंग्रेसने उत्तर दिले आहे. दोन पक्षांत सुरू झालेले हे युध्द आता किती दिवस चालते, का लवकरच संपते आणि केवळ पेल्यातील वादळ ठरते हे पाहावे लागेल.
पंजाब आणि दिल्लीमध्ये एखादी आई आपल्या मुलाला सगळ्यांत छोटी गोष्ट सांगू शकते. ती म्हणजे एक होती कॉंग्रेस…अशा शब्दांत काल मान यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेसची खिल्ली उडवली होती.
मान यांची ही बोचरी टीका कॉंग्रेसला मान्य होणे शक्यच नव्हते. कॉंग्रेसचे पवन खेरा यांनी आज मान यांना प्रत्युत्तर दिले आहे. आम आदमी पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार खूप जुळतात. कॉंग्रेसमुक्त भारत हेच दोघांचे स्वप्न आहे. मात्र दोघेही तोंडावर आपटणार आहेत. मात्र एका भोजपुरी चित्रपटाचे नाव आहे एक होता जोकर…तुम्ही तो पाहिला आहे का? असा सवाल खेरा यांनी विचारत मान यांना लक्ष्य केले.
कॉंग्रेसचे अन्य प्रवक्ते अशप्रीत यांनीही आपला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले एक होती आप म्हणणे चुकीचे ठरेल कारण ज्यांचा जन्मच झाला नाही त्यांच्यासाठी होता म्हणणे आयोग्य आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये आपला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत.