कोरोना लस, ऑक्सिजन, औषधांसह पंतप्रधानही झालेत गायब; राहूल गांधींची टीका

नवी दिल्ली,-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर टीका करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. करोनाची दुसऱ्या लाटेत उशिरा उपाययोजना केल्याने देशाला त्याची किंमत मोजावी लागली असा निशाणा ते वारंवार साधत आहेत. आजही राहुल गांधी यांनी सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला.

“कोरोना लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबतच पंतप्रधान मोदीही गायब झाले आहेत. उरले आहे ते फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर लागणारे जीएसटी आणि इकडे तिकडे सर्वत्र दिसणारे पंतप्रधानांचे फोटो”, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, कालच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही लसीकरणाच्या उत्सवावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. तसेच बुधवारी काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून सेंट्रल विस्टा प्रकल्प थांबवण्याची मागणी केली आहे.

सध्या दिल्लीत नवीन संसद आणि पंतप्रधान निवास कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे. सध्याच्या बिकट काळात या गोष्टींवर होणारा खर्च थांबवून तो कोरोनासाठी खर्च करण्याची गरज असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. इतर प्रकल्प थांबवून सध्या कोरोना लसीकरण आणि ऑक्सिजन यावर लक्ष देण्याची गरज आहे, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.