करोनाबाबत दिशाभूल करणाऱ्या माहितीविरोधात फेसबुक आक्रमक; जनजागृतीसाठी राबवणार मोहीम

नवी दिल्ली – सध्या जगभरात करोना विषाणू संसर्गाने अक्षरशः थैमान घातले आहे. जगभरातील  लाखो लोकांना या विषाणूमुळे आपले प्राण गमवावे लागले असून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विषाणूसोबतच समाज माध्यमांद्वारे पसरवली जाणारी  विषाणूबाबतची दिशाभूल करणारी माहिती देखील तितकीच धोकादायक ठरताना दिसत आहे.

अशातच फेसबुकने अशा प्रकारच्या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या माहितीविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. याबाबतची माहिती स्वतः फेसबुकतर्फे देण्यात आली असून फेसबुकने आपल्या मालकीच्या सर्व समाज माध्यमांवरून करोना विषयी गैरसमज पसरवणारी माहिती काढून टाकली आहे. करोनाबाबत दिशाभूल करणाऱ्या १२ दशलक्ष पोस्ट फेसबुक व इंस्टाग्रामवरून हटवण्यात आल्या आहेत.

करोनाबाबतची माहिती फॅक्ट चेकर्सने चुकीची असल्याचे कळवल्यानंतर फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेल्या जगभरातील १६७ दशलक्ष पोस्टवर ‘चेतावणी देणाऱ्या’ सूचना जोडल्या आहेत. अशा सूचना असलेल्या पोस्ट ९५ टक्के वापरकर्ते वाचत नाहीत असा दावाही फेसबुकने केलाय.

भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर करोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशात समाज माध्यमांवर करोना विषाणू आजाराबाबत अनेक दावे करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या माहितीवर विश्वास ठेवावा याबाबत जनजागृती करणारी मोहीम देखील फेसबुक राबवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी फेसबुक इंग्रजी व ९ भारतीय भाषांमध्ये www.fightcovidmisinfo.com/india/ ही वेबसाईट उघडणार आहे.

तसेच भारतीयांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा यासाठी डॉक्टर की सुनो या नावाने फेसबुक एक व्हिडीओ सिरीज देखील सुरु करणार आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स करोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती करतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.