नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी आतापर्यंत केवळ राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव चर्चेत होते. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यामुळे केरळमधील खासदार शशी थरूर यांचेही नाव समोर आले.
आता माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि मनीष तिवारी या आणखी दोन नेत्यांची नावे या पदासाठी रेसमध्ये असल्याचे संकेत मिळत आहेत.
याशिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्याही नावांची चर्चा होते आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणीही आपण इच्छूक नसल्याचे म्हटलेले नाही. कालच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही आपण स्पर्धेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
कर्नाटकातील कॉंग्रेसचे बडे नेते मल्लिकार्जुन खरगे, सिध्दरामय्या यांच्याही नावांची चर्चा होते आहे. दरम्यान, प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण नेमके चित्र येत्या 30 तारखेला समोर येईल असे कालच सिंह यांनीही म्हटले होते.
दरम्यान, राहुल गांधी उद्या दि. 23 सप्टेबर रोजी भारता जोडो यात्रा’पासून थोडी विश्रांती घेत सोनिया गांधी यांना भेटायला दिल्लीला येणार असल्याची चर्चा आहे. ते अध्यक्षपदाच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत.