दुबई – हिजाबच्या मुद्यावरून इराणमध्ये मोठे आंदोलन भडकले आहे. पोलिसांच्या कोठडीमध्ये 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हिजाब परिधान करण्याच्या सक्तीच्याविरोधात महिलांनी थेट रस्त्यावर उतरून निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावरून महिलांनी आक्रमकपणे आपल्या स्वातंत्र्याची भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. आंदोलन चिरडण्यासाठी सरकारकडून जी कडक पावले उचलली गेली आहेत, त्याची माहिती इन्स्टाग्राम आणि व्हॉटस ऍपवरून शेअर केली जाते आहे. आंदोलन अधिक चिघळू नये म्हणून इराणमधील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांमध्ये भडकलेल्या या आंदोलनातून सरकारला थेट आव्हान दिले गेले आहे. नहिलांनी भर रस्त्यातच हिजाब काढून फेकून दिले आणि जाळून टाकले आहेत. देशातील इस्लामिक प्रजासत्ताकचे सरकार खाली खेचण्याची मागणीही करण्यात आली आहे. तेहरान विद्यापीठात आणि कारमानशेह सारख्या पाश्चात्य शहरातही या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत.
2019 मध्ये अचानक गॅसचे दर वाढवल्यानंतर जसे आंदोलन भडकले होते, त्याचीच पुनरावृत्ती या आंदोलनात होते आहे. राजधानीसह एकूण 13 शहरांमध्ये आंदोलन भडकल्याचे इराणी वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. काही ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार आणि पाण्याचे फवारेही मारावे लागले आहेत. या आंदोलनामागे विदेशी शक्तींचा हात असल्याचा अधिकाऱ्यांचा आरोप आहे.
पोलिसांच्या गोळीबारात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र काही जण वेगळ्या गटांच्या गोलीबारात मारले गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
22 वर्षीय माहसाचा कोठडीत मृत्यू
वेशभुषेबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल माहसा अमिनी नावाच्या 22 वर्षीय तरुणीला इराणमधील नैतिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांच्या कोठडीत तिचा मृत्यू झाला होता. या मृत्यूचे पडसाद, अमेरिका, युरोपीय संघ आणि संयुक्त राष्ट्रातही उमटले आहेत. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र यावर विश्वास न ठेवता माहसाच्या वडिलांनी स्थानिक इमामांना तिच्या अंत्यसंस्काराची परवानगी दिली नव्हती.