सातारा – पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडलेले असताना आता केंद्र सरकारने घरगुती व कमर्शिअल गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. करोनानंतर उध्वस्त झालेले उद्योग, व्यवसाय काही अंशी उभे राहत असताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस येत आहे. केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीविरोधात जिल्हा कॉंग्रेस रस्त्यावर उतरली आहे. शुक्रवारी कॉंग्रेस भवनासमोर या दरवाढीचा निषेध करुन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्र सरकारचे महागाईवर कसलेही नियंत्रण नसून पेट्रोल- डिझेलचे दर वाढलेले असताना आता गॅस दरवाढ केली आहे. महागाई व जीवनावश्यक वस्तूंवरील दर वाढवल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने कॉंग्रेस भवनासमोर निदर्शने करत गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने चालवलेल्या लुटमारीच्या विरोधात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या आदेशानुसार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकारच्या महागाई विरोधात महागाईमुक्त भारत हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, “”भाजप सरकारच्या काळात महागाईचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. गॅस दरवाढीने आता ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीकडे वळू लागल्या आहेत.” यावेळी मोदी हटाव संसार बचाव, मोदी सरकारचा धिक्कार असो, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, कॉंग्रेस पक्षाचा विजय असो, गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अल्पनाताई यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, धनश्री महाडिक, जगन्नाथ कुंभार, मनोजकुमार तपासे, अन्वर पाशाखान, सुषमा राजेघोरपडे, रजिया शेख, अरबाज शेख आदी उपस्थित होते.