नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार सुनील सराफ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सराफ यांनी एका कार्यक्रमादरम्यान हवेत गोळीबार केल्याने तेअडचणीत येण्याची शक्यता आहे.
अनुप्पूर जिल्ह्यात नववर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सुनील सराफ यांनी भर स्टेजवरुन गोळीबार केला. या कार्यक्रमातील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओत सुनील सराफ ‘डॉन’ चित्रपटातील ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. नाचत असतानाच ते पिस्तूल बाहेर काढतात आणि हवेत गोळीबार करतात. भोपाळपासून ५७० किमी अंतरावर असणाऱ्या कोतमा शहरात हा धक्कादायक प्रकार घडला असल्याचे संगणयत येत आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कोतमा पोलीस स्टेशनने दिली आहे. जर थोडीशी चूक झाली असती तर मोठी दुर्घटना झाली असती असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान आमदाराने मात्र ही फटाक्यांची बंदूक होती असा दावा केला आहे.