श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरू असून कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचा अद्याप कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. दोन्ही पक्षांमधील चर्चेची पहिली फेरी अयशस्वी झाली आहे. कॉंग्रेस पक्षाकडून त्यावेळी जो प्रस्ताव देण्यात आला आहे तो आमच्या वरिष्ठांना अमान्य असेल असे नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात फारूख अब्दुल्ला यांनी जे वक्तव्य केले होते त्यावरून या दोन पक्षांत निवडणूक आघाडी होणार की नाही याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जम्मू काश्मीर, लडाखमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत.
गेल्या वेळी यातील बारामुला, अनंतनाग आणि श्रीनगर या तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या आहेत. तर भारतीय जनता पार्टीने जम्मू, उधमपूर आणि लडाख या जागा जिंकल्या होत्या. उमर यांच्या म्हणण्यानुसार जम्मू, उधमपूर, लडाखबाबत बोलणी सुरू आहेत.
त्यावरूनच नॅशनल कॉन्फरन्स काश्मीरमध्ये कॉंग्रेससाठी एकही जागा सोडण्यास तयार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या स्वत:कडे ज्या जागा नाहीत त्या जागांसाठीही ते कॉंग्रेसवर दबाव टाकत आहेत. अशा स्थितीत कॉंग्रेससमोर हे मोठे आव्हान असणार आहे.
दरम्यान, चर्चेत अद्याप कोणतीही प्रगती झाली नसली तरी उमर म्हणतात की त्यांचे समान उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीला पराभूत करणे आहे. सहकारी पक्षाच्या जागा कमी करणे त्यांचे लक्ष्य नाही. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचा मुद्दाही उपस्थित केला.
तर निवडणुकीच्या वेळीत भाजपमध्ये लोक येतील किंवा जातील. तो आमच्यासाठी फार मोठा विषय नाही. निवडणुकीच्या वेळी असे होतच राहते असे फारूख यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे आम्हाला आमच्या ताकदीवर आमची निवडणूक लढायची आहे.
कॉंग्रेससोबत उमर चर्चा करत आहेत. आम्ही एकत्र लढू. आम्हाला इंडिया आघाडी मजबूत करायची आहे. जर आम्ही तसे केले नाही तर देशाला संकटात टाकले असे होईल असेही त्यांनी नमूद केले.