रोहतक- हरियाणा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुमित्रा चौहान यांनी शनिवारी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सुमित्रा यांच्या कृतीमुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला हरियाणात मोठा हादरा बसला आहे. तिहेरी तलाक आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याबाबतच्या निर्णयांना कॉंग्रेसने विरोध दर्शवला. ती भूमिका न पटल्याने कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचे ठरवले. कॉंग्रेसची भूमिका जनभावनेच्या विरोधात जाणारी आहे, असे सुमित्रा यांनी भाजप प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले.
विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच हरियाणा कॉंग्रेसमधील गटबाजी उफाळून आल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातून गटबाजीला आवर घालण्यासाठी कॉंग्रेस नेतृत्वाने अलिकडेच हरियाणात महत्वाचे फेरबदल केले. त्यानुसार, माजी केंद्रीय मंत्री कुमारी सेलजा यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले.
तर माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्यात आले. हुडा यांना प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षही करण्यात आले. त्यामुळे कॉंग्रेसमधील गटबाजीला आळा बसेल असे वाटत असतानाच सुमित्रा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हरियाणा कॉंग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे सूचित होत आहे.