बॉलीवुडसह हॉलिवूडमध्येही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राचे जगभरात अनेक चाहते आहेत. तिच्या प्रत्येक घडामोंडीवर चाहत्यांची विशेष नजर असते. सोशल मीडियावरही तिला अनेक जण फॉलो करत असतात. तिचे जगभरात लाखो करोडो चाहते असल्यामुळेच प्रियांकाचे नाव इंटरनेटवरही सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या नावांमध्ये अग्रस्थानी असते.
पण सध्या तिच्या नावामध्ये गुगलचा गोंधळ झालेला दिसून येत आहे. प्रियांकाच्या नावासमोर गुगलमध्ये चोप्रा किंवा जोनास नव्हे तर चक्क “सिंह’ असे हे आडनाव पाहायला मिळत आहे. प्रियांकाच्या विकीपिडिया बॉक्समध्येदेखील प्रियांकाच्या नावासमोर “सिंह’ हे आडनाव दिसते. मात्र, त्यावर क्लिक केल्यानंतर प्रियांका चोप्रा असेच दिसत असल्यामुळे हा नेमका गोंधळ काय आहे, याचा शोध लागला नाही.
दरम्यान, काहींनी तर प्रियांकाच्या आगामी चित्रपटांचे तर हे कनेक्शन नाही ना, असा अंदाज व्यक्त केला आहे. यावर प्रियांकाची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण सध्या प्रियांका सिंह असा नावामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.