नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पक्षाच्या गुजरातमधील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यामुळे गुजरातबाबत कॉंग्रेसही दक्ष असल्याचे सूचित होत आहे. राहुल यांनी पक्षाचे गुजरात प्रभारी रघू शर्मा, प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर, कार्याध्यक्ष हार्दिक पटेल आदी नेत्यांशी चर्चा केली.
गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची रणनीती आणि सज्जता आदी मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली.
पक्षापुढील आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजना आदींवरही चर्चेचा भर राहिल्याचे समजते. मागील विधानसभा निवडणुकीत (2017) कॉंग्रेसने सत्तारूढ भाजपला जोरदार टक्कर दिली. मागील वेळेपेक्षाही यावेळी सरस कामगिरी करण्याची आशा कॉंग्रेस बाळगून आहे.
मात्र, नुकत्याच पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत पक्षाच्या पीछेहाटीचे सत्र कायम राहिले. त्या निवडणुकांचे निकाल कॉंग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहेत. त्यामुळे नव्या जोमाने उभे राहण्याची किमया पक्षाला करून दाखवावी लागणार आहे.
आताच्या निवडणूक निकालांतून धडा घेऊन कॉंग्रेस गुजरातबाबत पुरेशी दक्षता बाळगत असल्याचे संकेत राहुल यांच्या भेटीगाठींतून मिळत आहेत.