मीटर रीडिंग घेऊन जूनचे बिल : सोशल मीडियावरून चुकीचे मेसेज
पुणे – लॉकडाऊन कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार बिल देण्यात आले. सध्या मीटर रीडिंग घेऊन जूनचे बिल देण्यात येत आहे. मात्र, वीजबिलांबाबत सोशल मीडियावरून चुकीचे मॅसेज पाठवून ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. अशा अफवांवर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
ग्राहकांनी आपल्या वीज वापराची पडताळणी केली तर त्यांना आपले वीजबिल योग्य व अचूक असल्याचे लक्षात येईल. अनेक ग्राहकांनी स्वतःचे वीजबिल तपासून न बघता केवळ वीजबिलांची रक्कम जास्त दिसते म्हणून आलेले बिल चुकीचे आहे, असा समज करून घेत आहेत.
मागील वर्षाच्या उन्हाळ्याचा वीजवापर आणि चालू वर्षातील लॉकडॉऊनमध्ये 24 तास घरात राहून केलेला वीजवापर यांची तुलना केली तर असे दिसून येईल की, या वर्षातील एप्रिल, मे व जून महिन्यांतील वीजवापर हा मागील वर्षाच्या वीजवापराच्या तुलनेत बरोबर आहे. महावितरण ही खासगी कंपनी नसून सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय वीज कंपनी आहे.
त्यामुळे वीजबिलात कुठलीही आकारणी छुप्प्या स्वरूपात करीत नाही किंवा आकारणी करताना मनमानी करीत नाही. वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसारच ग्राहकांना वीजबिल आकारले जाते, असा दावा महावितरणने केला आहे. ग्राहकांच्या वीजबिलांवर सर्व माहिती छापील स्वरुपात दिलेली असून ग्राहकांनी वीजबिल संपूर्ण वाचले तर सोशल मीडियावर व्हायरल झालेला मॅसेज केवळ ग्राहकांची दिशाभूल करून ग्राहकांमध्ये रोष पसरविण्यासाठी तयार केला असल्याचे महावितरणने म्हटले आहे.